Ad will apear here
Next
पु. शि. रेगे, जेम्स बॉल्डविन, इसाबेल अजेंडे
आपल्या कवितांमधून अत्यंत धीट भाषेत स्त्रीच्या विविध रूपांचं सहजसुंदर वर्णन करणारे पु. शि. रेगे, अमेरिकेतल्या हार्लममधल्या आफ्रिकन लोकांच्या वाट्याला येणाऱ्या जीवनाविषयी तळमळीने लिहिणारे जेम्स बॉल्डविन आणि जगातली सर्वांत लोकप्रिय स्पॅनिश लेखिका इसाबेल अजेंडे यांचा दोन ऑगस्ट हा जन्मदिवस. आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याबद्दल...
.............
पु. शि. रेगे 

दोन ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरीतल्या मिठबाबमध्ये जन्मलेले पुरुषोत्तम शिवराम रेगे हे मराठीतले महत्त्वाचे कवी, निबंधकार, नाटककार आणि समीक्षक. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी अगदी लहानपणापासूनच कथा आणि नाटकं लिहिली होती; पण वयाच्या १६-१७ वर्षांपासून त्यांना कवितेची ओढ लागली. 

रेग्यांच्या कवितेत पुरुष आणि स्त्री यांच्याविषयी, विश्वातल्या सृजनाविषयी लिहिलेलं आहे. त्यांच्या कवितेतून स्त्रीची विविध रूपं – बाला, मुग्धा, तरुणी, पत्नी, माता, आदिमाता यांचं वर्णन येतं. प्रेम, मोह, काम, अश्लीलता अगदीच धीटपणे येते. रेगे छोट्या छोट्या वाक्यांतून प्रकृती, शक्तीची ओढ आणि आकर्षण यांविषयी लिहितात. त्यांनी वापरलेल्या नादमयी आणि अर्थवाही शब्दांमुळे त्यांची कविता भिडते. त्यांतल्या हळुवार भावनांमुळे थेट काळजात उतरते.

सावित्री’ ही त्यांची अत्यंत गाजलेली पत्ररूप कादंबरीसुद्धा एखाद्या तरल कवितेसारखीच!
रेग्यांनी आपल्या ‘छांदसी’ या पुस्तकातून ‘काव्याचं जीवनातील स्थान’, ‘साहित्यिक कोण?’, ‘साहित्य आणि जीवननिष्ठा;, ‘काव्य आणि सांकेतिकता’, ‘काव्याची जाण’, ‘माझ्या काव्याची भूमिका’, ‘श्लील-अश्लील’, ‘इंद्रिये आणि कला’ अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर वैचारिक लेखन केलं आहे.

मातृका, साधना, फुलोरा, दुसरा पक्षी, प्रियाळ, रूपकथ्थक, मनवा, सावित्री, अवलोकिता, रेणू, छांदसी अशी त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत.
 
१७ फेब्रुवारी १९७८ रोजी त्यांचं निधन झालं.
...................

जेम्स बॉल्डविन

दोन ऑगस्ट १९२४ रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या बॉल्डविनचं बालपण खडतर होतं. कारण तो ‘काळ्या’ अमेरिकन गुलामाचा नातू होता. त्याचे सावत्र वडील अत्यंत कडक शिस्तीचे होते आणि त्यांची त्यांच्या नऊ मुलांवर भलतीच जरब होती. त्यामुळे लहानपणी बॉल्डविन खूपदा तणावाखाली असे. त्यात त्यांना जातीवरून आणि रंगावरून समाजात हीन वागणूक मिळे. त्याचं बहुतेक लिखाण हे सामाजिक आणि जातीवादी अनिष्ट रूढींवर भाष्य करणारं आहे.
 
शाळकरी वयातच त्यानं कविता, कथा आणि नाटकं लिहायला सुरुवात केली होती. मोठा होऊन नोकरी करत असताना त्याला अनेक ठिकाणी जातीवरून, वर्णावरून वाईट वागणूक मिळाली होती आणि त्या विषयांवर त्यानं पुढे स्पष्टपणे लिहिलं. त्यानं पुढे पॅरिसला स्थलांतर केलं आणि त्याच्या लिखाणात आणखीच मोकळेपणा येत गेला. ‘गो टेल इट ऑन द माउंटन’ हे त्याचं आत्मचरित्रपर पुस्तक त्यानं स्वित्झर्लंडमध्ये असताना लिहिलं. त्याच्या हार्लममधल्या बालपणाच्या आठवणी यात त्यानं लिहिल्या आहेत.

त्या काळातल्या अनेक अनिष्ट चालीरीतींवर त्यानं लिहिलं, इतकंच नव्हे तर स्वतःच्या समलिंगी संबंधांबद्दल आणि एकूणच स्त्री-पुरुष संबंधांबद्दल त्यानं त्याची बिनधास्त मतं मांडली.

गो टेल इट ऑन दी माउंटन, दी आमेन कॉर्नर, दी फायर नेक्स्ट टाइम, इफ बिल स्ट्रीट कुड टॉक अशी त्याची पुस्तकं गाजली आहेत.

एक डिसेंबर १९८७ रोजी त्याचा फ्रान्समध्ये मृत्यू झाला.
.....................
इसाबेल अजेंडे

दोन ऑगस्ट १९४२ला पेरूची राजधानी लिमामध्ये जन्मलेली इसाबेल ही मूळ चिलीयन लेखिका. प्रेम, कौटुंबिक जिव्हाळा, आत्मीयता यांचा वेध घेणारी पुस्तकं तिनं लिहिली. चिलीमध्ये तिचे काका, साल्व्हादोर अजेंडे यांच्याविरुद्ध १९७३ साली रक्तरंजित उठाव झाल्यावर तिला व्हेनेझुएलामध्ये आश्रय घेणं भाग पडलं होतं. तिथं तिनं पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ‘दी हाउस ऑफ दी स्पिरीट्स’ ही आपली पहिली कादंबरी लिहिली
 
पाब्लो नेरुदांची मुलखात घेत असताना त्यांनी तिला सांगितलं होतं, की तिचा विचार करण्याचा आवाका पाहता तिने जर्नालिस्ट असण्यापेक्षा लेखिका बनावं आणि तिनं ते ऐकलं. तिथून तिचं नियमित लिहिणं सुरू झालं. पुढे १९८९ साली, आपल्या नवऱ्याबरोबर अमेरिकेत राहायला येईपर्यंत ती जगातली सर्वांत लोकप्रिय स्पॅनिश लेखिका म्हणून प्रसिद्ध झाली होती.

चिली सरकारचं राष्ट्रीय पारितोषिक आणि अमेरिकन सरकारच्या ‘प्रेसिडेन्शियल मेडल’बरोबरच तिला एकूण ३५ पुरस्कार मिळाले आहेत. दी हाउस ऑफ दी स्पिरिट्स, ऑफ लव्ह अँड शॅडोझ, आयलंड बिनीथ दी सी, एव्हा ल्युना,  माय इन्व्हेंटेड कंट्री, पॉला, अफ्रोडाइट, सिटी ऑफ दी बीस्ट अशी तिची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GXSNCP
Similar Posts
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय
नरेंद्र बोडके ‘समुद्राचा दुपट्टा सतत सळसळता, आपण पाठवतो पावसाच्या लिपीतले संदेश, खरं तर आपण नसतोच- सगळी असण्याची चलबिचल, आपल्या पलीकडे, आपण निरभ्र, शांततेहून पारदर्शी, मौनाइतके बोलके,’ असं मांडणारे कवी आणि पत्रकार नरेंद्र बोडके यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
जॉर्ज बर्नार्ड शॉ, ऑल्डस हक्स्ली, डॉ. मिलिंद जोशी एकीकडे २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती करताना, ‘पिग्मॅलिअन’ ह्या नाटकामुळे अजरामर झालेला महान आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या भविष्याचा वेध घेणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीमुळे गाजलेला ऑल्डस हक्स्ली या इंग्लिश लेखकांचा आणि ‘अनंत
व्यंकटेश माडगूळकर, रेखा बैजल आणि वि. म. दांडेकर व्यंकटेश माडगूळकर, रेखा बैजल आणि वि. म. दांडेकर या मराठी साहित्यिकांचा सहा जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, दिनमणी सदरात त्यांचा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language